सूर्याचे एक नाव आहे 'दिनमणी'. दिन म्हणजे दिवस. मणी हा शब्द तेजोगोल ह्या अर्थाने वापरला आहे. दिवसा सार्या सृष्टीला दृष्यमान करणारा, 'तम निशेचा' संपविणारा, आणि सार्या चराचरांना ऊर्जेचा अविरत पुरवठा करणारा तो 'तेजोनिधी लोहगोल' आहे. सजीवांना जगण्यासाठी अन्नाची गरज असते. वातावरणातील पाणी व कर्ब-द्वि-प्राणिल यांच्या प्रकाश-संश्लेषणाद्वारे वनस्पती प्राथमिक अन्न तयार करतात. प्रकाशाचा मूळ स्त्रोत अर्थातच सूर्य. इथे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे, की सजीवांचा जीव-की-प्राण असलेल्या प्राणवायूचे पुनर्विमोचनही याच प्रकाश-संश्लेषण प्रक्रियेत होत असते. अशाप्रकारे सजीवांना प्राणवायू पुरविण्याचे कामही तो सूर्यच अप्रत्यक्षरित्या करीत असतो. सजीवांना पाण्याची नितांत गरज असते. ऋतुचक्र फिरते ठेऊन सप्तसिंधूंचे पाणी सजीवांना सोपविण्याची सोयही तो सूर्यच करतो. यावरून स्पष्टपणे जाणवते ते हेच की जीवनाचे दुसरे नावच सूर्य असावे. जर सूर्य नसेल तर जीवन संभवतच नाही.
संप ही प्रतिष्ठितांविरूद्ध कष्टकर्यांनी करावयाच्या संघर्षाची एक संकल्पना आहे. रशियन राज्यक्रांतीनंतरच्या समाजवादी युगात संप, ही संकल्पना रूढ झाली. मालकांकरवी आपल्या उचित मागण्या मान्य करवून घेण्यासाठी, विहीत काम करण्यास संघटीतपणे नकार देण्याचा हा हक्क आधुनिक जगाने मान्य केला. वारंवार क्रांतीची गरज भासू नये म्हणून, असहाय्य कामगारांनी, सशक्त व्यवस्थापनाशी, संघर्ष करण्याचा सनदशीर मार्ग म्हणजे संप.
सर्व सृष्टीची उलाढाल ज्याचे ऊर्जेविना अशक्य आहे तो सूर्य असहाय्य नाही, अशक्त तर नाहीच नाही. त्याला सृष्टीविरूद्ध संप जर करावयाचा असेल तर तेवढी सृष्टी सशक्त नाही. शिवाय आपले म्हणणे कुणी मान्य करावे ह्यासाठी सूर्य सृष्टीवर अवलंबून नाही. म्हणून 'सूर्य संपावर गेला तर.....' हे शीर्षकच विसंगत आहे. 'सूर्यावाचून जीवन' असा एक अर्थ त्यापासून काढता येईल व तशी कल्पना करता येईल. पण मग खरा प्रश्न तर हा असेल की 'सूर्यावाचून जीवन ...., किती काळ?' ह्या प्रश्नाची अनेक उत्तरे संभवतात. या शीर्षकाशी सुसंगत निबंध लिहायचा असेल, तर त्या उत्तरांचाच उहापोह करावा लागेल.
महाभारतीय युद्धात अभिमन्यूनी रणांगणावर देह ठेवल्यानंतरचा दिवस. एक प्रहर दिवस शिल्लक असतांनाच सूर्य मावळतो. अन्यायाने अभिमन्यूचा शेवट करणार्यांना शासन करण्यास असमर्थ ठरलेला अर्जुन अग्निकाष्ठे भक्षण करण्यास सिद्ध होतो. हे असंभव दृष्य सदेह साजरे करण्यासाठी स्वत: जयद्रथ युद्धभूमीवर प्रकट होतो. आणि काय आश्चर्य, सुदर्शन चक्रापाठी अदृष्य झालेला सूर्य कृष्णलीलेने दीप्तीमान होतो. मग काय! 'हा सूर्य अन् हा जयद्रथ' असे कृष्णाने अर्जुनास सांगताच जयद्रथाचा वध होतो. अन्यायाचे परिमार्जन होते. काही काळच सूर्य अदृष्य होण्याचा हा किस्सा जगदविख्यात आहे. यात सूर्य अदृष्य होण्याचा निव्वळ आभास घडविलेला आहे. एरव्हीही सूर्याच्या अभावातच त्याच्या प्रभावाची जाणीव आपल्याला सदैव होत असते.
चंद्राच्या पाठीमागे सूर्य दडतो तेंव्हा सूर्यग्रहण होते. काही काळच का होईना पण सूर्य (पूर्णत: किंवा भागश:) दिसेनेसा होतो. या काळात अज्ञात आकाशस्थ वस्तू, ज्या एरव्ही प्रखर सूर्यप्रकाशात दिसत नाहीत त्या दिसू शकतात. म्हणून अशा वस्तूंचा वेध घेण्याची संधी मिळते. म्हणूनच आजकाल ग्रहणांचा अभ्यास केला जातो. अशाप्रकारे काही काळ सूर्य (पूर्णत: किंवा अंशतः) दिसेनासा होण्याने खगोलशास्त्रात नवे शोध लागू शकतात.
वैशाखवणवा संपतासंपता मौसमी वारे सिंधूसागरावरून काळ्याकुट्ट ढगांची फौज देशावर घेऊन येतात. रात्रीच काय पण दिवसाही दिसेनासे होते. भर दिवसा आकाशात सूर्य कुठे असावा हे सुद्धा सांगता येत नाही. दिवसचे दिवस, किंबहूना आठवडे-आठवडे सूर्यदर्शन होत नाही. सूर्याच्या नसण्याने काय होते त्याचे वर्णन करण्याची मुळी गरजच उरत नाही. प्रत्येकाला सूर्य कधी उगवेल याचीच भ्रांत पडलेली असते. कारण, कारण ..... . धुतलेले कपडे सुकत नाहीत. वातावरणातली वाढलेली आर्द्रता श्वसनाच्या रोगांचे भांडार उघडते, जसे की सर्दी, दमा, न्युमोनिया वगैरे वगैरे. रस्तोरस्ती तुंबलेले पाणी चिखलात रूपांतरित होत असते तर आजुबाजूची डबकी डासांच्या पैदाईशीची माहेरघरेच बनतात. माशांचे काफीले घराघरांवर आक्रमण करतात. कोकणात उडत्या पाखरांच्या पंखांनाही शेवाळं फुटावं अशी परिस्थिती असते. आणि म्हणूनच या सार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सूर्याची अतिशय निकड भासू लागते. सूर्याच्या अभावानी नरक वाटू लागणारा परिसर, मग त्याचे प्रभावानीच स्वर्गवत होऊ लागतो. सूर्य प्रकटताच रोगराई आपला पसारा आवरू लागते, डास, माशांना पुढील पर्वणीची वाट बघावी लागते. रस्ते सुकून कोरडे पडतात. धुतलेले कपडे वाळू लागतात. पिके जोमाने वर येतात. अन् सुगीचे दिवस येतात.
मात्र बराच काळ सूर्य नसला तर पृथ्वीवर हाहा:कार उडेल. दैनंदिन ऊर्जेची आवक थांबेल. ऊर्जेचा जमवलेला साठा हळूहळू पण निश्चित स्वरूपानी कमी होत जाईल. मौसमी वार्यांना खीळ बसेल. ऋतुचक्र थांबेल. दिनचर्या, रात्रंदिन, अहर्निश हे शब्द अर्थहीन होतील. धृवप्रदेशाप्रमाणे भलीमोठी रात्रच काय ती शिल्लक उरेल. अंतत: तिथल्या प्रमाणेच सारी सृष्टी निर्जीव व बर्फमय होईल.
हे असे जर असेल तर, सूर्य नकोसा वाटेल असे कधी होऊ शकेल काय? हो! अशाही परिस्थितीची कल्पना करता येईल. आजही असे अनेक प्रदेश आहेत जिथे उन्हाळा कमालीचा तापतो. मग कविवर्य 'अनिल' वर्णन करतात 'केळीचे सुकले बाग' अन् 'कशी करू तुज सावली, माझ्या प्रितीच्या फुला' असा त्यांना प्रश्न पडतो. कवीयत्री इंदिरा संतांना 'वर आकाशी सूर्याची भट्टी तापली, तापली' ह्या वास्तवाचे वर्णन करावे लागते. जमिनीला तडे पडतात. जो सूर्य एरव्ही सप्तसिंधुंतून आपल्यासाठी पाणी आणतो, तोच सूर्य दिन प्रतिदिन, साठलेले पाणीही आकाशात उडवून लावतो. सारी सजीव सृष्टी पाण्यावाचून तडफडू लागते. अन् मग वाटतं की नको हा सूर्याचा ताप. अशावेळी, कल्पना करा की दर दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ सूर्यानी जर वामकुक्षी घेतली तर किती बरे होईल. तुम्ही विश्वास ठेवणार नाही. पण सध्यातरी हे खरेच शक्य आहे. भर उन्हाळ्यात उटीला जाऊन रहा. सूर्य माथ्यावर यायचाच अवकाश की आकाश ढगांनी भरून येईल. पावसाचा शिडकावा वातावरण कमालीचे गार करेल. अन् त्यावर इंद्रधनुष्ये विखुरण्यासाठी पुन्हा सूर्य आकाशात तळपू लागेल. यावरून एक वेगळेच वास्तव उघडकीस येईल. मानवाला स्वर्ग वाटेल असे वातावरण सूर्यच र्निर्मितो. पण ते सृष्टीवर जिथे असते तिथे सारेच लोक मात्र राहू शकत नाहीत. दैव, दैव म्हणतात ते हेच तर नाही!
स्वर्गसमकक्ष सृष्टी सजते कधी? तर ऋतुचक्र पूर्ण होतांना! हिवाळा, ऊन्हाळा, पुन्हा पावसाळा अशाप्रकारचे ऋतुचक्र पूर्ण होते तेंव्हा सुगीचे दिवस येतात. स्वच्छ कोरडी हवा, ऊबदार सूर्यप्रकाश, भरपूर पाणी व विपूल अन्नधान्य यांनी सृष्टी संपन्न असते. स्वर्ग सृष्टीवर अवतरतो. आणि हो, हा स्वर्ग साऱ्यांनाच उपभोगता येतो. म्हणूनच `सूर्य संपावर गेला तर ...... ` काय होईल ह्या निष्फळ चिकित्सेत उगाच न गुंतता `सूर्य सजीवांना धार्जिणा होतो तेंव्हा ...... ` म्हणजेच ऋतुचक्र पूर्ण होतांना हिवाळयात, माणसे सण अन् उत्सवांत रमून जातात. अन् हीच या शिर्षकास समर्पक साठा उत्तरांची कहाणी नव्हे काय?
सूर्य पुरवू द्या सार जीवनासी ।
प्राणवायू अन् अन्न सजीवांसी ।।
ऋतुचक्रही सदैव फिरवू दे तो ।
इथे जो तो स्तोत्रेच त्याची गातो ।।
१. "लेखणीतील शाई" या प्रशांत मनोहर यांच्या अनुदिनीवर मला एक अत्यंत सुरेख सूर्यवर्णन सापडले ते असेः
रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्तसुरग: ।
निरालम्बो मार्ग: चरणविकल: सारथिरपि ।
रविर्यान्तेवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसा ।
क्रियासिद्धिर्सत्वे महति महतां नौपकरणे ।।
अर्थ:
सूर्याच्या रथाला एक चाक, सात आंधळे घोडे व पांगळा सारथी आहे. असं असूनही आकाशातलं अमर्याद अंतर, खंड न करता सूर्यदेव दररोज पार करतात. तात्पर्य, थोर माणसे कार्यसिद्धीच्या कसोटीला उतरतात, त्यामुळेच त्यांना थोरपणा प्राप्त होतो. त्यांच्या जवळील उपकरणांमुळे नव्हे.
२. श्री रामदास स्वामीकृत श्रीसूर्यस्तुती
जयाच्या रथा एकची चक्र पाहीं ।
नसे भूमी आकाश आधार काहीं ॥
असे सारथी पांगुळा ज्या रथासी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ १ ॥
करी पद्म माथां किरीटी झळाळी ।
प्रभा कुंडलांची शरीरा निराळी ॥
पहा रश्मी ज्याची त्रिलोकास कैसी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ २ ॥
सहस्त्रद्वये दोनशे आणि दोन ।
क्रमी योजने जो निमिषार्धतेन ॥
मना कल्पवेना जयाच्या त्वरेसी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ३ ॥
विधीवेदकर्मास आधारकर्ता ।
स्वधाकार स्वाहादि सर्वत्र भोक्ता ॥
असे अन्नदाता समस्तां जनांसीं ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ४ ॥
युगे मंत्रकल्पांत ज्याचेनि होती ।
हरिब्रह्मरूद्रादि त्या बोलिजेती ॥
क्षयांतीं महाकाळरूप प्रकाशी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ५ ॥
शशी तारका गोवुनी जो ग्रहांते ।
त्वरें मेरू वैष्टोनियां पूर्वपंथें ॥
भ्रमे जो सदा लोक रक्षावयासी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ६ ॥
समस्तां सुरांमाजि तूं जाण चर्या ।
म्हणोनीच तू श्रेष्ठ त्या नाम सूर्या ॥
दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशीं ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ७ ॥
महामोह तो अंधकारास नाशी ।
प्रभा शुद्ध सत्त्वाची अज्ञान नाशी ॥
अनाथा कृपा जो करी नित्य ऐसी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ८ ॥
कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची ।
न पाहू शके शत्रु त्याला विरंची ॥
उभ्या राहती सिद्धी होऊन दासी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ९ ॥
फळे चंदनें आणि पुष्पे करोनी ।
पुजावें बरें एकनिष्ठा धरोनी ॥
मनी इच्छिले पाविजे त्या सुखासी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ १० ॥
नमस्कार साष्टांग बापा स्वभावें ।
करोनी तया भास्करलागीं घ्यावें ॥
दरिद्रें सहस्त्रादि जो क्लेश नाशी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ११ ॥
वरी सूर्य आदित्य मित्रादी भानू ।
विवस्वान इत्यादिही पादरेणू ॥
सदा वांच्छिती पूज्य ते शंकरासी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ १२ ॥
३. क्रांतीसूर्य बाबा आमटे ह्यांची "थांबला न सूर्य कधी" ही कविताही सूर्याच्या महतीचे यथार्थ वर्णन करते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा