२००९०९१९

भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११२४

मूळ इंग्रजी लेखः ग्लोबल वॉर्मिंग: मीन्स टु अरेस्ट
मूळ इंग्रजी लेखकः गोरा चक्रबोर्ती

२६ जुलै २००६ रोजी एकाच दिवसात संततधार ९४४ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या काही वर्षांत कॅटरिनासारख्या वादळांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. डिसेंबर २००६ मधे दोहा शहर अनैसर्गिकरीत्या, पावसासहित आलेल्या वादळाने पंगुवत झाले होते. गेल्या वर्षी, २००७ साली, राजस्थानच्या वाळवंटी क्षेत्रांत, जैसलमेर जिल्ह्यात हिरवळ उगवली होती. अलीकडील सहा वर्षांत काढलेल्या पश्चिम बंगाल आणि बांगला देशाच्या उपग्रह प्रकाशचित्रांत असे लक्षात आलेले आहे की पूर्वी दिसणार्‍या १०२ बेटांपैकी फक्त १०० बेटेच हल्ली दिसून येत आहेत. वैज्ञानिकांच्या मते, समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे ती दोन बेटे पाण्याखाली बुडाली आहेत व म्हणून दिसेनाशी झालेली आहेत. अनेक वर्षांपूर्वीही, या दोन बेटांवर सुंदरी वृक्ष आढळत असत आणि बंगालचे (पांढरे) वाघ त्यांवर फिरत असत. २००८ दरम्यान, पश्चिम बंगाल, बांगला देश आणि उत्तर-पूर्व भारतात पावसाळा जवळपास एक महिना पुढे सरकला आहे. भारताच्या निरनिराळ्या भागांत, उन्हाळ्याचा कालावधी वाढत चालला आहे आणि हिवाळ्याचा कालावधी घटतो आहे. पश्चिम बंगालमधे, हिवाळ्यात खूप पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. उत्तर धृवीय प्रदेशात मोठ्या भूभागावरचे हिमावरण मोकळे झाले आहे. परिणामतः पांढर्‍या अस्वलांचे रहिवास-क्षेत्र लक्षणीयरीत्या घटला आहे. हिमालयावरील शिखरांचे हिमावरण मोठ्या प्रमाणात उणावले आहे. अंटार्टिकावरील मोठे हिमपर्वत समुद्रात कोसळले आहेत. अमरनाथ मंदिरातील मुख्य शिवलिंग अलीकडे तयारच होत नाही. ४ जुलै २००८ रोजी चित्रतारा अमिताभ बच्चन यांचे घराशेजारचा बंगला भरतीदरम्यान अंशतः पाण्यात बुडाला. त्यादिवशी भरती समुद्रसपाटीच्या ४.८३ मीटर्स उंच पर्यंत आलेली होती. मुंबईतील सर्वाधिक भरती पातळी ५.१ मीटर्स आहे. अर्थात, जवळजवळ दीड फूट चढलेले पाणी, तासाभरातच उतरले. मुंबईचे महापालिका आयुक्त श्री.जयराज फाटक यांचेनुसार, भूतापामुळे समुद्रपातळीत वाढ झालेली दिसून येते. परिणामतः मुंबईतील काही खोलातील भाग जसे की किंग्जसर्कल, हिंदमात सिनेमा, ग्रँटरोड स्टेशनजवळचा भाग, नाना चौक, जुहू विले-पार्ले, सांताकृझ इत्यादी, मध्यम पाऊस पडल्यावरही, भरती असल्यास पाण्यात बुडू शकतात. ते, “एन्व्हिरॉन्मेंट अँड अर्बनायझेशन” या नियतकालिकाच्या एका अलीकडील अंकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखासंदर्भात बोलत होते.

वरील घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत. त्या हेच सिद्ध करतात की भूताप सुरू झाला आहे आणि त्यास आळा न घातल्यास काही शतकांतच या सुंदर अवनीतलावर मनुष्य रहिवास अशक्य होऊन जाईल. गेल्या तीन शतकांत, भारतासहित निरनिराळ्या देशांतील शास्त्रज्ञ भूतापाबाबत फार हट्टाग्रही झालेले आहेत. कारण भूतापाची पार्श्वभूमी मानवी कर्मांनीच घडवली आहे.

ती आहेतः १. औद्योगिकीकरण, कारखाने व व्यापारकेंद्रे ह्यातील वाढ आणि वाहनसंख्येतील वाढ २. शेती आणि मानवी वसाहतींसाठी केली गेलेली जंगलतोड आणि ३. मनुष्य व शाकाहारी प्राण्यांच्या संख्येत झालेली अतोनात वाढ.

भूतापाचे मुख्य कारण पर्यावरणातील कर्ब-द्वि-प्राणिल वायूत झालेली वाढ. दिवसा सूर्यकिरणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात आणि पृष्ठभागावरच अंशतः शोषली जातात, ज्यामुळे पृष्ठभागाचे तापमान वाढते. उर्वरित किरणे आकाशात परावर्तित होतात. रात्री, सूर्याच्या अनुपस्थितीत, तापलेल्या पृथ्वीच्या पृष्ठभागातून उष्णता आकाशात प्रेरीत केली जाते आणि पृथ्वी पहाटेच्या तापमानावर पुन्हा परतते. दुसर्‍या दिवशी सूर्योदयासोबत तेच तापमानचक्र पुन्हा सुरू होते. तेच तापमानचक्र दिवसामागून दिवस चालत राहिल्याने, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान आणि पर्यावरण यांच्यात एक संतुलन उत्क्रांत झाले आहे. ऋतूबदलासोबतच पर्यावरणाचे तापमानही बदलत असते आणि हा बदलही ऋतुचक्रासोबत लयबद्ध रीतीने घडून येत असतो, त्यातही एक संतुलन साधले गेले आहे. इथे हे उद्धृत करता येईल की पर्यावरणीय तापमान केव्हाही निखळ शून्य (अबसोल्यूट झिरो) तापमानाच्या म्हनजेच शून्य अंश केल्व्हीनच्या खाली जात नाही किंवा त्याची बरोबरीही करत नाही. धृवीय प्रदेशात, जिथे सूर्य सहा महिने अनुपस्थित असतो, तिथेही पर्यावरणीय तापमान ५० अंश सेल्शिअस म्हणजेच २२३ अंश केल्व्हीनहून खाली जात नाही. वास्तवात, पर्यावरण ज्यात पृथ्वीचा समावेश असतो, ते सौर उष्णतेचा काही भाग शोषून घेते. असे घडून येते कारण हवेत प्राणवायू व नत्रवायूसोबतच काही वायू असे असतात जे सौर उष्णतेस सक्रिय असतात. उषणता प्रारणास सक्रिय वायू आहेत कर्ब-द्वि-प्राणिल वायू, कर्ब-एक-प्राणिल वायू, गंधकाची प्राणिले, मिथेन आणि मिथेनसदृश सेंद्रिय वायू, क्लोरो-फ्लुरो-कर्ब (सी.एफ.सी.) वगैरे. पर्यावरणातील या उष्णता-प्रारण-सक्रिय वायूंमुळे पर्यावरण आणि पृथ्वीचा पृष्ठभाग उबदार राहतात. ज्या प्रभावामुळे हे घडून येते त्याला हरितकुटी प्रभाव म्हणतात आणि त्या उष्णता-प्रारण-संवेदनशील वायूंना हरितकुटी वायू म्हणतात.

दिवस पृथ्वीचा पृष्ठभाग सूर्यकिरणे अंशतः शोषून घेऊन तापतो आणि मग अवरक्त (इन्फ्रा-रेड) उष्णता-प्रारणे प्रसवू लागतो. उष्णता-प्रारण-संवेदनशील वायू या प्रकारे प्रेरित उष्णतेतील काही भाग शोषून घेतात आणि तापतात. हे तप्त वायू मग कमी तापमानावरील विश्वाकडे ह्या उष्णतेस प्रेरित करतात. मात्र यापैकी काही उष्णता या वायुंमधेच अडकून राहते व मग पर्यावरणाचे तापमान वाढते. पर्यावरणाचे तापमान वाढताच विश्वाकडे वाहणार्‍या उष्णतेचे प्रमाणही यथावकाश वाढते. अशाप्रकारे पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून शोषलेली अवरक्त उष्णता आणि विश्वाकडे प्रेरित केली जाणारी अवरक्त उष्णता यांत संतुलन साधले जाते आणि त्यायोगे पर्यावरणाचे तापमानही संतुलन गाठते. याआधीच उल्लेख केल्याप्रमाणे, हा प्रभाव म्हणजेच हरितकुटी प्रभाव. यामुळे पर्यावरण तापले आहे आणि ते भूपृष्ठावरील पाण्यामुळे आर्द्रही झाले आहे. म्हणूनच ते रहिवासायोग्यही झाले आहे, सृष्टी हिरवीगार झाली आहे, सुंदर झाली आहे. हरितकुटी प्रभावाचा अभाव असता तर, सूर्यकिरणांची उष्णता पर्यावरणात अडकली नसती आणि पृथ्वीचा संपूर्ण पृष्ठभाग वर्षभरच हिमाच्छादित राहिला असता.

पृथ्वीच्या उत्क्रांतीदरम्यान जेव्हा पर्यावरन, जमीन आणि समुद्र यांची प्रथम निर्मिती झाली होती तेव्हा पृथ्वीवर जीवन नव्हते. पर्यावरणात कर्ब-द्वि-प्राणिलाचे प्रमाण खूप जास्त होते. उत्क्रांतीद्वारे प्रथम वनस्पती अवतरल्या. सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत प्रकाशसंश्लेषणाद्वारे वनस्पतींनी पर्यावरणातल्या कर्ब-द्वि-प्राणिलाचा काही भाग स्वतःत गुंतवला. सुरूवातीस जिवाणू वा प्राणी पृथ्वीवर अस्तित्वात नसल्यामुळे, वनस्पतींचे जीवनचक्र अक्षर राहत असे. मृत वनस्पती पृथ्वीच्या पृष्ठभागावर हळूहळू साठत त्यांचे ढीग जमा होत जात. यथावकाश ते ढीग मातीखाली गाडले गेले आणि दगडी कोळसा व मातीच्या तेलात रुपांतरित झाले. दगडी कोळसा व मातीचे तेल जमिनीखाली साठत राहिले. मग सावकाश प्राणीजीवन उत्क्रांत झाले. जीवाणूंच्या प्रभावामुळे मग मृत वनस्पतींचे विघटन सुरू झाले. मृत वनस्पती मग पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ढीग बनून राहत नाहीत असे झाले. विघटनाद्वारे ते मातीत मिसळून जाऊ लागले आणि पर्यावरणात मुक्त होऊ लागले. अशाप्रकारे उत्क्रांतीमुळे पर्यावरणात कर्ब-द्वि-प्राणिलाकरता एक संतुलन प्रस्थापित झाले. पर्यावरणातील हे कर्ब-संतुलन १८५० पावेतो वा त्यासुमारास पर्यंत अढळ राहिले.

त्याकाळच्या एका अंदाजानुसार, त्याकाळी हवेतील एकूण कर्ब ७५० अब्ज टन होते. ५५० अब्ज टन कर्ब पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्राणी आणि वनस्पतींमधे अस्तित्वात होते. जमिनीखालील दगडी कोळसा व मातीच्या तेलाच्या स्वरूपात १०,००० अब्ज टन कर्ब होते. १,००० अब्ज टन कर्ब समुद्रातील वरच्या स्तरांत विरघळेलेल्या अवस्थेत अडकलेले होते. तर खोल समुद्रात पाण्यात विरघळलेल्या आणि गाळात अडकलेल्या अवस्थेत ३६,००० अब्ज टन कर्ब होते. त्याकाळी वातावरणातील ७५० अब्ज टन कर्बाच्या अस्तित्वामुळे, वातावरणातील कर्ब-द्वि-प्राणिलाचे प्रमान २९० भाग प्रती दशलक्ष होते. हे कर्बाचे संतुलन खालील चक्राप्रमाणे अस्तित्वात राहिले.

सेंद्रिय हालचालींमुळे वातावरणात मुक्त होणारे कर्ब = दरसाल १०० अब्ज टन
समुद्र जलातून मुक्त होणारे कर्ब = दरसाल ९० अब्ज टन
एकूण पर्यावरणात साचणारे कर्ब = दरसाल १९० अब्ज टन
प्रकाशसंश्लेषणाद्वारे हवेतून काढले जाणारे कर्ब = दरसाल १०० अब्ज टन
समुद्र जलात विरघळून हवेतून काढले जाणारे कर्ब = दरसाल ९० अब्ज टन
एकूण पर्यावरणातून काढले जाणारे कर्ब = दरसाल १९० अब्ज टन

सेंद्रिय हालचाली म्हणजे प्राणी व वनस्पतींचे श्वसन, सेंद्रिय वस्तूंचे विघटन आणि स्वयंपाकाकरता जाळले जाणारे लाकूड ज्यांतून वातावरणात कर्ब-द्वि-प्राणिल मुक्त होत असे. प्रकाशसंश्लेषणाद्वारे वनस्पती, वातावरणातील कर्ब-द्वि-प्राणिल शोषून, सूर्यकिरणांच्या उपस्थितीत, वनस्पतींच्या पानांत असलेल्या हरित-रंजक-द्रव्याच्या साहाय्याने, त्याचे अन्नांत रुपांतरण करतात. समुद्रातील पाण्यातल्या सेंद्रिय हालचालींमुळे आणि पाण्यातील प्रवाह व समुद्रातील पाण्याच्या तापमातील फरकांमुळे कर्ब-द्वि-प्राणिल वातावरणात मुक्त होतो. काही कर्ब-द्वि-प्राणिल समुद्र जलात विरघळतो आणि वातावरणातून नाहीसा होतो. या कर्बचक्रानुसार, असे निरीक्षणास येते की दरसाल १९० अब्ज टन कर्ब वातावरणात मुक्त होत असे आणि तेवढाच कर्ब वाताअवरणातून काढलाही जात असे. यामुळे १८५० पर्यंत वातावरणातील कर्बचक्र संतुलन अढळ राहिले.

१८५० नंतर, मनुष्याच्या काराभाराने पर्यावरणाच्या प्रदूषणास सुरूवात झाली. जेव्हा औद्योगिक क्रांतीस सुरूवात झालेली होती, तेव्हाचाच तो काळ होता. परिणामतः खूप कारखाने उभारले जाऊ लागले होते. कारखान्यांकरता खूप वाफ आणि विजेची गरज होती. या शक्तीचा पुरवठा मुख्यत्वे दगडी कोळसा जाळूनच केला जाऊ लागला. परिवहन क्षेत्रात प्रथमच कोळसा वापरला जाऊ लागला. तो वापर लोहमार्ग, जहाज आणि वाफेच्या चालनायंत्रांपुरताच मर्यादित होता. त्यानंतर स्वयंचलित वाहनांचा वापर सुरू झाला आणि अगदी अलीकडेच म्हणजे १९४० च्या सुमारास विमान वाहतूकीस सुरूवात झाली. या दोन्ही प्रकारच्या वाहनांत, इंधन म्हणून खनिज तेलाचा उपयोग होऊ लागला. मग, घरगुती वापर, बाजार, व्यापारी केंद्रे आणि कारखान्यांतून विस्तृत प्रमाणात विजेचा वापर सुरू झाला. या घडामोडींमुळे, विसाव्या शतकाच्या मध्यात औद्योगिक क्रांती कळसास पोहोचली. याकाळात, दगडी कोळसा व खनिज तेलाचा मुक्त वापर पाश्चात्य विकसित देशांपुरताच मर्यादित होता, जिथी जगाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ३०% लोकसंख्याच राहत असे. गेल्या शतकाच्या अखेरीस, अविकसित देशांतून जलद विकासाच्या हालचाली सुरू झाल्या. हे देश मुख्यतः आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील होते. विकसनशील देशांमधे जर सर्वात जास्त लोकसंख्येच्या भारत आणि चीन या देशांनी विकसित देशांच्या राहणीमानाच्या अर्ध्यापर्यंत जरी राहणीमान, कोळसा व तेलाच्या ज्वलनाद्वारे उंचावले, तरी पर्यावरण प्रदूषणाच्या बाबतीत गुंतागुंतीची स्थिती उद्भवेल.

कारखान्यांत आणि ऊर्जा-संयंत्रांत कोळसा व तेलाच्या विपूल वापरासोबतच जर स्वयंचलित वाहने, बसेस, मालठेले आणि खेचगाड्या (ट्रेलर्स) यांत होणार्‍या मुक्त खनिज तेल वापरामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात कर्ब-द्वि-प्राणिल मुक्त होऊ लागला. पूर्वीच उद्धृत केल्याप्रमाणे, १८५० मधे या वायूचे वातावरणातील प्रमाण २ भाग प्रती लक्ष होते. १९७० मधे ते वाढून ३.२५ भाग प्रती लक्ष झाले आणि जून २००८ मधे ते ३.८५ भाग प्रती लक्ष पर्यंत पोहोचले आहे. अर्थातच ही वाढ मानवी कारभारांमुळेच झालेली आहे. १८५० मधे जगाची लोकसंख्या केवळ १२६ कोटी होती. २००० मधे ती वाढून ५८० कोटी झाली आणि जून २००८ पर्यंत ती ६७० कोटींवर पोहोचलेली आहे. या, १५० वर्षांतील पाच ते सहा पट लोकसंख्यावाढीस सामावून घेण्यासाठी नव्या भूमीस मोकळे करण्याची गरज निर्माण झाली. या वाढीव लोकसंख्येच्या उदरनिर्वाहार्थ नव्या, विस्तृत शेतीयोग्य जमिनीची गरज निर्माण झाली. या राहण्याच्या आणि शेतीच्या जमिनीकरता मोठ्या प्रमाणात जंगलतोड आवश्यक ठरली. त्यामुळे या जमिनीवरचे वृक्षावरण घटून प्रकाशसंश्लेषणाद्वारे पर्यावरणातील कर्बोत्सर्गाचे प्रमाणही घटले. वरील दोन मानवी कारभारांमुळे, पर्यावरणातील कर्बचक्र संतुलन पुढील प्रमाणे बदलले.

अष्मिभूत इंधनदहनामुळे हवेत मुक्त होणारे कर्ब = दरसाल ०५ अब्ज टन
जंगलतोडीमुळे हवेतील कर्बोत्सर्ग घटल्याने हवेतच राहणारे कर्ब = दरसाल ०२ अब्ज टन
सेंद्रिय हालचालींमुळे वातावरणात मुक्त होणारे कर्ब = दरसाल १०० अब्ज टन
समुद्र जलातून मुक्त होणारे कर्ब = दरसाल ९० अब्ज टन
--------------------------------
एकूण पर्यावरणात साचणारे कर्ब = दरसाल १९७ अब्ज टन
प्रकाशसंश्लेषणाद्वारे हवेतून काढले जाणारे कर्ब = दरसाल १०२ अब्ज टन
समुद्र जलात विरघळून हवेतून काढले जाणारे कर्ब = दरसाल ९२ अब्ज टन
--------------------------------
एकूण पर्यावरणातून काढले जाणारे कर्ब = दरसाल १९४ अब्ज टन

वरील कर्बचक्र संतुलनाने हे स्पष्त होते की दरसाल ३ अब्ज टन कर्ब हवेत जमा होत आहे. या हवेतील अतिरिक्त कर्बामुळे सूर्यकिरणांची थोडी अधिक उष्णता वातावरणात अडकून राहत आहे. परिणामतः वातावरणाचे तापमान सावकाशपणे वाढत आहे. म्हणजेच भूताप सुरू झालेला आहे. भूतापाचे दीर्घकालीन परिणाम खाली दिल्याप्रमाणे असतात.

१.उष्णता लाट आणि उबदार हवा जास्त काळ नांदेल.
२.समुद्रजल अधिक उबदार होईल, म्हणून मग समुद्रपातळी वाढेल आणि किनार्‍यावरील काही भूभाग पाण्याखाली जाईल.
३.पर्वतशिखरांवरील हिमनद्या वितळतील, त्यामुळे या नद्यांतील प्रवाह घटतील.
४.उत्तर आणि दक्षिण धृवांवरले हिमावरण वितळेल.

याव्यतिरिक्त, लगेचच खालील लक्षणेही जाणवू लागतील.

१. उन्हाळ्याचा कालावधी वाढेल आणि हिवाळ्याचा कालावधी घटेल.
२. वाढलेल्या उष्मकालामुळे काही रोगांच्या प्रसारास धार्जिणे वातावरण राहील. डास, माशा, विषाणू आणि जीवजंतूंचे प्रजनन गरम हवेत वाढते. परिणामतः मलेरिया, हिवताप (एन्सेफेलायटीस), हैजा, कांजिण्या इत्यादींसारख्या रोगांचा दूरवर प्रसार होईल.
३. उष्ण आणि आर्द्र क्षेत्रे वाढतील आणि थंड कोरडी क्षेत्रे घटतील. परिणामतः प्राणी आणि वनस्पतींच्या क्षेत्रीय सीमा विस्तारतील वा घटतील. अनेक प्राणी व वनस्पतींची संख्या घटेल वा त्या नामशेष होतील.
४. समुद्रतळातील प्रवाळांचे रंगीत दृश्य जांभळे फिकट होऊन जाईल.
५. अनैसर्गिक संततधार पाऊस आणि हिमवर्षावामुळे पूर्वी पूर न येणार्‍या भागांतही पूर उद्भवेल.
६. लांबलेले दुष्काळ, कधीकाळी हिरवीगार असणारी क्षेत्रे, सतत तापवत राहतील.

या लक्षणांना बारकाईने पाहिल्यास, या लेखाच्या सुरूवातीस उल्लेखलेल्या घटनांवरून अशा निष्कर्षाप्रत येता येईल की भूताप आधीच सुरू झालेला आहे. भूतलावरील तापमानांच्या मापनानेही सिद्ध झालेले आहे. १८६० ते १९०० दरम्यान पृथ्वीचे तापमान ०.७५ अंश सेल्शिअसने वाढले. विसाव्या शतकात ही वाढ १ अंश सेल्शिअसने होती. तर या शतकात ती १.४ ते ५.८ अंश सेल्शिअस असण्याचा अंदाज आहे. विसाव्या शतकात समुद्रपातळीत १० ते २० सेंटीमीटर वाढ झाली. जर हल्लीचीच परिस्थिती कायम राहिली तर असा अंदाज आहे की या शतकात समुद्रपातळी ८८ सेंटीमीटरने वाढेल. वाचक समजू शकतात की जर समुद्रपातळी एक मीटरने वाढली तर बेटावरला देश मालदीव पूर्णपणे समुद्रात बुडेल. नाईल नदीचा त्रिभूज प्रदेश आणि बांगलादेश ४०% समुद्रात बुडतील. समुद्रपातळीतील वाढ दोन कारणांनी होईल.

१. समुद्रजलाचे तापमान वाढल्याने समुद्रजलाच्या आकारमानात वाढ झाल्याने.
२. पर्वतशिखरांवरील आणि धृवीय प्रदेशांवरील हिमावरण वितळल्याने समुद्रजलाच्या परिमाणात वाढ होऊन.

समुद्रजलाचे तापमान वाढल्यामुळे, आनखीही एक आपत्ती कोसळण्याची शक्यता आहे. यापूर्वीच लिहील्याप्रमाणे १,००० अब्ज टन कर्ब, कर्ब-द्वि-प्राणिल स्वरूपात समुद्रजलात विरघळलेला असतो. या वायूची विद्राव्यता समुद्रजलाच्या तापमानावर अवलंबून असते. समुद्रजलाचे तापमान वाढल्यास ते द्रावन संपृक्त होऊन अतिरिक्त ठरकेला कर्ब-द्वि-प्राणिल पुन्हा हवेत मुक्त होईल. अशाप्रकारे समुद्रजलाचे तापमान वाढल्यास वातावरणातील कर्ब-द्वि-प्राणिलाचे प्रमाण वाढेल आणि त्यायोगे भूतापासही आणखी गती लाभेल.

वरील चर्चेवरून हे निश्चित होते की मानवी संस्कृतीच्या विकासार्थ केलेल्या मानवी कारभारांमुळेच भूताप निर्माण झालेला आहे. म्हणून आता जर मानवी संस्कृतीचे भवितव्य मानवी प्रयत्नांनीच सुनिश्चित करायचे असेल तर हरितकुटी वायूंचे वातावरणातील उत्सर्जन घटवायला हवे आहे किंवा या वायूंचे वातावरणातून होणारे उत्सर्जन वाढवले जाणे गरजेचे आहे. कुणी एक संस्था, व्यक्ती, उद्योग वा देश या भूतापाच्या प्रश्नाची सोडवणूक करू शकणार नाही. सध्या विकसित आणि विकसनशील देशांच्या राहणीमानातील तफावत आश्चर्यकारकरीत्या खूप मोठी आहे. विकसित देशात जगातील केवल ३०% लोकच राहतात आणि तेच एकूण हरितकुटी वायू उत्सर्जनाच्या ७५% उत्सर्जनास जबाबदार आहेत. विकसित, विकसनशील देश आणि भारतातील दरमाणशी कर्बोत्सर्जनाचे प्रमाण खाली दिले आहे.

अमेरिकाः दरसाल, दरमाणशी २०.१० मेट्रिक टन
जपानः दरसाल, दरमाणशी ०९.८७ मेट्रिक टन
युरोपिअन देशांचा संघः दरसाल, दरमाणशी ०९.४० मेट्रिक टन
भारतः दरसाल, दरमाणशी ०१.०२ मेट्रिक टन

म्हणून, वरवर पाहता असे वाटेल की केवळ श्रीमंत आणि विकसित देशच भूतापास कारण ठरत आहेत. पण योग्य रीतीने विचार करता, असे लक्षात येईल की विकसनशील किंवा अविकसित देशही विकासाचा तोच मार्ग चोखाळत आहेत. जर या देशांनी विकसित देशातील राहणीमानाच्या अर्धीही राहणीमानाची पातळी गाठली तरी सध्याच्या कर्बोत्सर्जनाच्या तिप्पट पातळी गाठली जाईल. अशी परिस्थिती मानवी संस्कृतीस अवश्य विनाशाप्रत नेईल. विकसित देशांना त्यांच्या राहणीमानाचा स्तर कमी करण्यास सांगता येणार नाही, त्याचप्रमाणे विकसनशील/अविकसित देशांनाही त्यांच्या राहणीमानास उंचावण्यापासून रोखता येणार नाही. तसेच हेही लक्षात घेतले पहिजे की श्रीमंत व गरीब दोन्ही प्रकारच्या देशांचे नागरिक एकाच पर्यावरणात राहणार आहेत. म्हणून या समस्येचे समाधानही सार्‍या देशांनी मिळूनच करायचे आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माँट्रियल संहितेद्वारे (प्रोटोकोल) केलेला प्रयत्न हा, हरितकुटी वायूंच्या उत्सर्जनास मर्यादित करण्याबाबतचा, पहिला संयुक्त प्रयत्न होता. यात असे म्हटले होते की, ओझोन यायूच्या थरास हानी पोहोचू नये म्हणून, क्लोरो-फ्लुरो-कार्बन वायूचे उत्सर्जन २००० सालपर्यंत थांबवायला हवे. क्लोरो-फ्लुरो-कार्बन वायूचा वापर शीतन आणि फवारा उद्योगांमधे मोठ्या प्रमाणावर होत असे. समाधानाची गोष्ठ ही आहे की या वायूचे उत्सर्जन रोखण्यात ही संहिता यशस्वी झाली होती. श्रीमंत देशांनी, गरीब देशांना क्लोरो-फ्लुरो-कार्बन वायूच्या वापराकरता पर्यायी तंत्रज्ञान विकसित करण्यास मदत केल्यानेच हे शक्य झाले. ओझोन थरातील घट रोखली गेली, पूर्वी घडून आलेल्या हानीत सुधारणा होण्याचे आणि ओझोन थर पूर्ववत होण्याचा कल असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. कर्ब-कराद्वारे, कर्ब-द्वि-प्राणिल वायूच्या उत्सर्जनावरही त्या संहितेत मर्यादा घालण्यात आलेली होती. मात्र हा प्रस्ताव कदाचित यशस्वी होऊ शकणार नाही. कारण या वायूचा मुख्य स्त्रोत, ऊर्जेसाठी अष्मिभूत इंधनाचे ज्वलन हा आहे. हीच ऊर्जा विजेचे उत्पादन आणि कारखान्यांच्या कामी येत असते. दगडी कोळसा आणि खनिज तेल यांव्यतिरिक्त, दुसरा पर्यावरणस्नेही, स्वस्त ऊर्जास्त्रोत, व्यापारी वीज उत्पादनासाठी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत, अष्मिभूत इंधनांचा वापर होतच राहील.

या लेखात आतापर्यंत, भूतापाची कारणे आणि परिणाम यांची चर्चा केलेली होती. आता भूताप रोखण्याच्या उपायांबाबत चर्चा करू या. सद्यस्थितीत भूतापाची प्रक्रिया पूर्णतः थांबवणे शक्य होणार नाही. मात्र त्या दिशेने प्रेरित होऊन कार्य करणे श्रेयस्कर ठरेल. भूतापाचे कारण मानवी कारभार हेच असल्याचे यापूर्वी दाखवून दिलेले आहेच. म्हणून, त्यावरील उपायही मानवी कारभारांतूनच यावे लागतील. याकरता वनसंहार थांबवावा लागेल आणि तो ही ताबडतोब थांबवणे गरजेचे आहे. अवनीतलावरील प्रत्येक मनुष्य यात सहभागी होऊ शकेल. कर्बोत्सर्जनाचा एक प्रमुख स्त्रोत, वाहनांतूअ जाळले जाणारे पेट्रोल आणि डिझेल असते. प्रचलित जीवनशैलीची परिवहन ही महत्त्वपूर्ण गरज असल्यामुळे रस्त्यावरील वाहनांचा वापर कमी करणे वा थांबवण्याचा विचारही करता येत नाही. म्हणूनच पेट्रोल आणि डिझेलवर चालणार्‍या वाहनांची कार्यक्षमता सुधारणे गरजेचे झालेले आहे. भारतासहित आशिया व आफ्रिकेतील सर्वच देशांत खूप जुनी, नादुरुस्त वाहने वापरली जात आहेत, ज्यांची कार्यक्षमता खूपच घटलेली असते. जर आजच्या तंत्रज्ञानाच्या आधारे या वाहनांची कार्यक्षमता सुधारता आली, तर हवेचे प्रदूषण घटेल आणि इंधनवापरही कमी होईल. या ठिकाणी हा विचार करणे ही महत्त्वाचे आहे की, बससारख्या सार्वजनिक परिवहन सेवांचा वापर मोठ्या प्रमाणात करून खासगी वाहनांचा वापर कसा कमी करता येईल. यासंदर्भात सर्व देशांच्या सरकारांनी, योग्य त्या सार्वजनिक परिवहन सेवांसाठी, आवश्यक त्या पायाभूत सुविधा यशस्वीरीत्या निर्माण कराव्या लागतील.

पर्यावरणातील कर्बोत्सर्गाचा प्रमुख स्त्रोत औष्णिक विद्युत संयंत्रांशी संबंधित आहे. आजकाल जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वीज ही काळाची गरजच झालेली आहे. कारखाने, व्यापारकेंद्रे, कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि घरगुती वापराकरता विजेचा भरपूर वापर होत असतो. हल्ली व्यापारी वीज, औष्णिक, जलविद्युत आणि आण्विक संयंत्रांतून निर्माण केली जाते. याव्यतिरिक्त, वीज निर्मिती सौरघट आणि पवनचक्क्यांद्वारेही करता येते. यांपैकी औष्णिक विजनिर्मिती केंद्रांतुन केलेली निर्मिती, हल्ली सर्वात अधिक लोकप्रिय आहे. हीच केंद्रे हरितकुटीवायू उत्सर्जनाचे प्रमुख कारण असतात. जलविद्युत निर्मितीकेंद्रे हवेत कर्बोत्सर्जन करत नाहीत. तरीही ती पर्यावरणस्नेही नसतात. कारण त्याकरता एका मोठ्या जलाशयाची गरज असते. ज्याकरता, अनेकानेक प्राणी आणि मोठ्या संख्येत राहणार्‍या मनुष्यांची सुपीक, हिरवी जमीन पाण्याखाली जाते. सौरघट हवेत प्रदूषण सोडत नसल्याने फारच आशादायक आहेत. मात्र, सद्य-तंत्रज्ञान-अवस्थेत, व्यापारी वीज निर्मितीकरता, ते वापर अशक्य व्हावा एवढ्या प्रमाणात, कमालीचे महाग आहेत. तर दुसर्‍या बाजूस, पवनचक्क्यांद्वारे निर्माण होणारी वीजही प्रदूषणमुक्त असते. भारतासहित अनेक देशांनी तिचा मर्यादित प्रमाणात स्वीकार केलेला आहे. पवनऊर्जा सीमित जागांवर, सीमित वेळच उपलब्ध होत असल्याने या पद्धतीने, खात्रीपूर्वक वीजनिर्मिती मोठ्या प्रमाणात करणे शक्य होत नाही.

आण्विक वीज निर्मिती संयंत्रे हवेत प्रदूषण सोडत नाहीत, व म्हणूनच पर्यावरणस्नेही असतात. आण्विक संयंत्रांतून निर्माण झालेली वीज सक्षमखर्ची असते आणि त्यात निर्माण झालेल्या विजेची किंमत, औष्णिक वीजनिर्मितीकेंद्रांत निर्माण झालेल्या विजेच्या किंमतीच्या तुल्यबल असते. सध्या जगातील एकूण व्यापारी विजेच्या गरजेच्या १६% गरज आण्विक विजेद्वारे भागवली जाते. अणुऊर्जा युरेनियमपासून मिळवली जाते. ती थोरियमपासूनही मिळवता येते. जगातील थोरियम आणि युरेनियमचे साठे, जगाची विजेबाबतची गरज ८०० वर्षांपर्यंत भागवण्यास पुरेसे आहेत. हळूहळू जेव्हा अणुस्त्रोतांद्वारे पुरेशी वीज उपलब्ध होईल तेव्हा, त्यापैकी काही भाग परिवहन सेवा क्षेत्राकरता वळवता येईल. शहरांतर्गत वाहतूक आणि शहरांदरम्यानची वाहतूकही विद्युत बस, ट्राम आणि लोहमार्गांद्वारे करता येते. डिझेल आणि पेट्रोल चालित वाहने हळूहळू रस्त्यांवरून नाहीशी होतील. आण्विक ऊर्जा अतिरिक्त झाल्यास, उद्जन वायूचे उत्पादन केले जाईल.

आजकाल, पाण्यातून वीज पाठवून उद्जन निर्मिती करण्यात येते. ह्याला विद्युत विघटन म्हणतात. या प्रक्रियेत, निर्मित उद्जनाची किंमत, निर्मिती निरुत्साहित व्हावी एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिशय जास्त असते. पाण्याचे तापमान खूप जास्त उंचावले जाते, जिथे पाण्याचे रेणू उद्जन व प्राण वायूच्या मूलकांमधे विघटित होतात. उद्जन मूलके धन असतात तर प्राण वायू मूलके ऋण असतात. धनाग्र व ऋणाग्रांच्या योग्य जोडणीद्वारे उद्जन वायू-टाकीत उच्च दाबाखाली जमा करता येतो. तांत्रिकदृष्ट्या जर ही प्रक्रिया यशस्वी करता आली तर उद्जन उत्पादनही स्वस्त होऊ शकेल.

हल्ली ज्याप्रमाणे दाबित नैसर्गिक वायूच्या टाक्या वापरून वाहने चालवतात, त्याप्रमाणे उद्जन वायूच्या टाक्या वापरून रिक्षा, टॅक्सी, मोटारी, बसेस इत्यादी वाहने चालवता येतील. उद्जन चालित वाहने प्रदूषण सोडत नाहीत कारण उद्जनाच्या ज्वलनात केवळ पाण्याचे रेणू निर्माण होतात. म्हणजे उद्जन वापर प्रदूषणमुक्त असतो. तत्त्वतः आण्विक ऊर्जेद्वारे विद्युत मागणी आणि परिवहन मागणी भागवता येणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. पहिला भाग म्हणजे अणुऊर्जेद्वारे विद्युत उत्पादन. हे सिद्ध झालेले आहे आणि सक्षमखर्चीही असते. मात्र अणुऊर्जेद्वारे उद्जन निर्मिती अजूनही यशस्वी झालेली नाही. तरीही ज्या गतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत होत आहे, त्यावरून अशी अपेक्षा करता येते की भविष्यात ते शक्य होईल. उद्जन चालित चालनायंत्रे भारतातही यशस्वीरीत्या विकसित करण्यात आलेली आहेत.

संपूर्ण जगाची विजेची मागणी आण्विक ऊर्जेद्वारे भागवता येईल असे विश्वासाने म्हणता येईल. त्यामुळे, पर्यावरणातील कर्बोत्सर्जन खूपच घटेल आणि मानवी संस्कृती भूतापाच्या शापातून मुक्त होईल. मात्र दुःखानेच हे नमूद करावे लागेल की अणुऊर्जेद्वारे वीज उत्पादनाचे तंत्रज्ञान भारतासहित केवल काही देशांतच सीमित आहे. जगात फक्त ३३ देशच आण्विक विद्युत निर्मिती करतात. यापैकीही अनेक देश अणुऊर्जा संयंत्रांचे अभिकल्पन करू शकत नाहीत. हे देश अणुसमर्थ राष्ट्रांचे मित्रदेश असल्याने ते अणुऊर्जा संयंत्रे मिळवू शकलेले आहेत. अणुस्फोटक निर्मिती आणि अणुतंत्रज्ञान यांत थेट संबंध असल्याने, कुठलाही अणुतंत्रधारी देश इतर देशांना अणुऊर्जा संयंत्रे विकसित करण्यात मदत करू इच्छित नाही. अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर जर एखादा देश इतर देशांकडून अणुऊर्जा संयंत्रे मिळवू इच्छित असेल तरीही, तो देश विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगत असावा लागतो. अशा परिस्थितीत, बव्हंशी अविकसित देशांना सध्या अणुऊर्जा संयंत्रे मिळवणे दुरापास्त झालेले आहे. भारताची स्थिती वेगळी आहे. भारताचे स्वतःचे अणुतंत्रज्ञान आहे आणि भारत स्वतःच्या विजेच्या गरजेपैकी ३% गरज सध्याही अणुऊर्जेद्वारे भागवत आहे. पण भारताजवळ युरेनियमचे उत्तम साठे नाहीत. परिणामतः भारताचा आण्विक ऊर्जेचा कार्यक्रम अतिशय मंदावलेला आहे. अण्वस्त्रप्रसारबंदी करार पक्षपाती असल्याने भारताने त्यावर स्वाक्षरी केलेली नाही. म्हणून इतर कुठलाही देश भारतास युरेनियम विकणार नाही. अशा अवस्थेत अमेरिकेने पुढाकार घेऊन भारतासोबत करार-१२३ केला. त्यामुळे, भारत आपल्या अणुऊर्जा कारयक्रमास गती देण्यास समर्थ व्हावा असे अपेक्षित आहे.

भूतापास याआधीच सुरूवात झालेली आहे आणि आपण त्याची सुरूवातीची लक्षणेही स्पष्टपणे अनुभवू लागलो आहोतच. सध्याच्या मानवी संस्कृतीच्या भरभराटीकरता, भूतापाची शक्यता, मानवी कारभारांमुळे निर्माण झालेली आहे. अशीच जर स्थिती राहिली तर, ही सुंदर धरती भविष्यातही अशीच सुंदर राहणार नाही. जगातील कुठल्याही देशस असे घडलेले आवडणार नाही. वर्तमान पिढी बहुधा सुंदर धरतीवर आयुष्य उपभोगेल. पण भविष्यातील पिढी हल्लीच्या धरतीचे सौख्य अनुभवू शकेल काय? कुठल्याही सुसंस्कृत माणसास असे घडू नये असेच वाटेल. प्रत्येक मातापित्यास, आपल्या सर्व सामर्थ्यानिशी, आपल्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल घडवायचे असते म्हणून वर्तमान पिढीला शर्थीचे प्रयत्न करून भूतापास आळा घालावा लागेल, ज्यामुळे भविष्यातील पिढीलाही हल्लीच्या सुंदर धरतीवरील सौख्ये प्राप्त होऊ शकतील. एकही व्यक्ती वा देश एकट्याने हे साध्य करू शकणार नाही. अशी अपेक्षा आहे की सर्वच देश पुढे येऊन एकजुटीने, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे भूतापास आळा घालू शकतील. मग सुंदर धरतीवरले सुंदर पर्यावरण सदासर्वदा सुंदरच राहील.
पर्यायी मराठी शब्द

इंग्रजी पारिभाषिक शब्दांना पर्यायी मराठी शब्द

१ Atmosphere वातावरण
२ Climate ऋतूमान
३ Cloro-Fluro-Carbon (CFC) क्लोरो-फ्लुरो-कार्बन
४ Dilapilated खूप जुनी, नादुरुस्त
५ Environment पर्यावरण
६ Environment friendly पर्यावरणस्नेही
७ Fossil fuel अष्मिभूत इंधन
८ Global Warming भूताप, सृष्टीताप
९ Green House हरितकुटी, हरितगृह
१० In course of time यथावकाश
११ Incessantly संततधार
१२ Infrared अवरक्त
१३ Mineral oil खनिज तेल
१४ Nuclear Capable States अणुसमर्थ देश
१५ Oxides प्राणिले
१६ Protocol संहिता
१७ Refrigeration शीतन
१८ Solar cell सौरघट
१९ Spray फवारा
२० State of the art सद्य-तंत्रज्ञान-अवस्थेत
२१ Vociferous हट्टाग्रह
२२ Wheather हवामान
२३ Wrath संकट, शाप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: