२०११११०२

ऊर्जेचे अंतरंग-१८: सर्वव्यापी किरणोत्सार

किरणोत्सार आपल्या सभोवार पसरलेला आहे. एका सामान्य माणसाला सगळ्या स्त्रोतांकडून मिळणारा किरणोत्साराचा संसर्ग जर १००% धरला, तर त्यातला किती संसर्ग कशापासून आपणास होत असतो ते खाली दिलेले आहे.

१. घरेः आपल्याला मिळणार्‍या किरणोत्साराचा ५५% हिस्सा रेडॉनद्वारे मिळतो. रेडॉन हा एक वायू आहे जो जमिनीतील नैसर्गिक युरेनियमपासून उत्पन्न होतो. रेडॉन जो घरांतून दडलेला असतो.
२. शुश्रुषालयेः आपल्याला मिळणार्‍या किरणोत्सारापैकी सुमारे १५% किरणोत्सार वैद्यकीय आणि दंत-क्ष-किरणचिकित्सेतून मिळतो.
३. मानवी शरीरः आपल्याला मिळणार्‍या किरणोत्सारापैकी सुमारे ११% किरणोत्सार आपल्या शरीरांतच असतो - तो, आपण खातो त्या अन्नातून आणि पितो त्या पाण्यातून मिळत असतो.
४. सूर्यः आपला जवळजवळ ८% किरणोत्सार, बाह्य अवकाशातून येतो - सूर्य आणि तार्‍यांपासून.
५. खडक आणि मातीः जवळजवळ ८% किरणोत्सार, खडक आणि मातीतून येतो.
६. दूरदर्शनसंचः आपल्याला मिळणार्‍या किरणोत्सारापैकी सुमारे ३% किरणोत्सार दूरदर्शन संचांसारख्या वस्तूंतून मिळतो.
७. विमानेः अमेरिकेस ओलांडून जाणार्‍या एका जाऊन-येऊन केलेल्या फेरीत आपल्याला वर्षभरात मिळणार्‍या किरणोत्साराच्या १% किरणोत्सार सोसावा लागतो.
८. अणुऊर्जासंयंत्रः अणुऊर्जासंयंत्रापासूनच्या ५० मैलांच्या परिघात राहणार्‍यांना, त्या कारणाने, आपल्याला वर्षभरात मिळणार्‍या किरणोत्साराच्या ५०,००० व्या हिश्याहूनही कमी किरणोत्साराचा मुकाबला, करावा लागतो.

क्रमांक १ ते ८ पर्यंतच्या सामान्य माणसाच्या वाट्यास येणार्‍या किरणोत्सारात, नैसर्गिक किरणोत्साराचाच वाटा मुख्य असल्याचे दिसून येते; मानवनिर्मित किरणोत्साराचा वाटा त्याच्या तुलनेत नगण्य वाटावा एवढाच काय तो दिसतो. त्याच्या भीतीने विकासाचा मार्ग सोडावा एवढ्या प्रमाणात तो मुळी अस्तित्वातच नाही.

प्रत्येक व्यक्तीस निरनिराळ्या स्त्रोतांद्वारे मिळणार्‍या किरणोत्साराची मात्रा१

६९० सूक्ष्मसिव्हर्ट/वर्ष नैसर्गिक पृष्ठभूमीतून मिळते
२०० सूक्ष्मसिव्हर्ट/वर्ष चिकित्सेसाठी छातीचे क्ष-किरण चित्रण करतांना मिळते
००५ सूक्ष्मसिव्हर्ट/वर्ष अन्य स्त्रोतांकडून मिळते

आपल्यावर भूपृष्ठातून नैसर्गिक स्वरूपात उत्सर्जित होणार्‍या गॅमा किरणांचा परिणाम तर होतोच, शिवाय आपल्या शरीरात सुद्धा पोटॅशियम आणि कर्बाच्या नैसर्गिक समस्थानिकांच्या रूपात किरणोत्सारी पदार्थ अत्यल्प प्रमाणात अस्तित्वात असतात. साधारणत: भूपृष्ठाद्वारे होणार्‍या उत्सर्जनाचे प्रमाण व त्याचा प्रभाव मानव निर्मित उत्सर्जनाच्या बाधेपेक्षा अधिक असतो.

सामान्य माणसाला विविध मार्गाने होणारा सरासरी संसर्ग



विविध शहरांमधील नैसर्गिक भूपृष्ठांद्वारे होणारे उत्सर्जन



जेव्हा एका व्यक्तीची बदली मुंबईहून दिल्लीला होते तेव्हा त्याला २१६ सूक्ष्म-ग्रे नैसर्गिक उत्सर्जनाची अतिरिक्त मात्रा मिळते, जी एका अणुविद्युतगृहापासून मिळणार्‍या उत्सर्जन मात्रेपेक्षा १० पट अधिक असते. (गॅमा प्रारणाकरता १ सूक्ष्म ग्रे हे परिमाण, १ सूक्ष्म सिव्हर्ट च्या सममूल्य असते).

उत्सर्जनाच्या प्रमाणाची माहिती मिळवण्याकरता आणि त्याचे मोजमाप करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे तयार केली गेली आहेत. या उपकरणांच्या साह्याने जगामधील इतर स्थानांप्रमाणे भारताचा पण एक नकाशा तयार केला गेलेला आहे, ज्यामध्ये नैसर्गिक प्रकारे होणारे उत्सर्जन-प्रमाण दाखवले आहे. भारतात काही जागी नैसर्गिक उत्सर्जन-प्रमाण अधिक आहे त्यामुळे तिथे राहणार्‍या जनतेस होणार्‍या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. पृथ्वीवर ब्राझील, चीन, फ्रान्स व भारतात जगातील सर्वाधिक उत्सर्जनाचे प्रमाण असलेली स्थाने आढळून आली आहेत.

दक्षिण केरळ व तमिळनाडूच्या समुद्रतटांजवळील भागात उत्सर्जनाचे प्रमाण, राष्ट्रीय उत्सर्जनाच्या प्रमाणापेक्षा ६ पटीने अधिक आहे. केरळ आणि तामिळनाडूच्या अशा भागांत जवळ जवळ १ लाख लोक राहतात. ह्यामधील काही लोकांना उत्सर्जनाच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा १० पटीने अधिक बाधा होते. तरी देख़ील एवढया मोठया प्रमाणातील उत्सर्जनामुळे तेथील जनतेवर कोणताही हानीकारक प्रभाव आढळून आलेला नाही. तसेच अणुविद्युतकेंद्राच्या आसपास राहणार्‍या जनतेसही उत्सर्जनाची बाधा अत्यंत कमी प्रमाणात होते असे आढळून आलेले आहे.

मानवनिर्मित प्रकारे होणार्‍या उत्सर्जनामध्ये वैद्यकीय व दंत क्ष-किरणामुळे रूग्णास अधिक मात्रा मिळते. अणुकेंद्रावर काम करणारे लोक, कोळशाच्या खाणीतील कामगार, क्ष-किरण तंत्रज्ञ इत्यादींवर होणारा उत्सर्जनाचा अनुज्ञप्त परिणाम हा सामान्य जनतेवर होणार्‍या परिणामाच्या तुलनेत अधिक असतो. परंतु सरकारद्वारा ह्यासंदर्भात आवश्यक देखरेख ठेवली जाऊन त्याचे निर्धारण व नियमन केले जाते. आंतरराष्ट्रीय किरणोत्सार सुरक्षा बचाव आयोग (आई.सी.आर.पी.) द्वारा निश्चित मापदंडांच्या आधारे एका वर्षात अनुज्ञप्त मात्रेची मर्यादा जास्तीत जास्त ५० मिलिसिव्हर्ट आहे. परंतु भारतीय अणुऊर्जा नियामक मंडळाने (ए.ई.आर.बी.) ही मर्यादा ३० मिलिसिव्हर्ट निश्चित केली आहे३.

संस्तुत मात्रा मर्यादा

२० लघू-सिव्हर्ट/साल प्रारण व्यावसायिक कर्मचार्‍यांकरता
०१ लघू-सिव्हर्ट/साल सामान्य जनतेकरता

एवढा किरणोत्सार सभोवती असतांना त्याचा संसर्ग होणारच की!

उपसर्गानी शब्दाचा अर्थ तो बदलतो पुरा । प्रहार-आहार-विहार-संहारा परी तो स्मरा ॥

एक साधासा वाटणारा शब्द आहे सर्ग. म्हणजे अध्याय. प्रकरण. मात्र उपसर्गामुळे त्याचे खालीलप्रमाणे कितीतरी शब्द घडू शकतात, ज्यांचे अर्थ निरनिराळे आहेत.

निसर्ग = नि+सर्ग = Nature
विसर्ग = वि+सर्ग = Discharge
उत्सर्ग = उत्‌+सर्ग = Ejection, Emition
उपसर्ग = उप+सर्ग = Modifier, Affection
संसर्ग = सं+सर्ग = Exposure, Infection

तर ह्या संसर्गाचेच मापन आणि नियमन आपल्याला करायचे असते.

रेडॉन वायू



हवेपेक्षा सुमारे आठपट जड असणारा रेडॉन वायू, हा बहुधा सर्वात जड वायूंपैकी एक आहे. सामान्य तापमानावर हा राजस वायू रंगहीन, गंधहीन असतो. मात्र त्याच्या गोठणबिंदूच्या, २०२°K (-७१°C किंवा -९६°F) खालीपर्यंत निववल्यास, संघनित होऊन उजळ-पिवळ्या-नारिंगी रंगात प्रस्फुरित होऊन, तो झळकू लागतो. कारण असते, त्यातून होणारे किरण-उत्सर्जन. रेडॉन-२२२ अल्फा किरणोत्सर्जनाने विघटित होतो. त्याचे अर्धायू ३.८ दिवसांचे असते. सामान्यतः तुम्ही रेडॉन पाहू शकत नाही. त्याचा वास किंवा चवही घेता येत नाही. तरीही तुमच्या घरातच तो समस्या बनून नांदू शकतो. तो जमिनीतील युरेनियमच्या विघटनातून येत असतो. तो म्हणजे अमेरिकेतील फुफ्फुसाच्या कर्करोगाचे दोन क्रमांकाचे, आघाडीचे कारण आहे. घराबाहेर रेडॉनची पातळी कमी असते, तर घरात मात्र ती जास्त असू शकते. दर १५ घरांमधील एका घरात रेडॉनची पातळी, ०.१४८ बेक्वेरल/लिटर ह्या धोक्याच्या पातळीहून, वाढलेली आढळू शकते. अमेरिकेत दरसाल २१,००० लोक त्याची शिकार होत असतात. रेडॉन, थोरॉन आणि त्यांच्या वंशजांच्या श्वसनातून शरीरात प्रवेश करण्यामुळे, भारतीय लोकसंख्येस अंदाजे दरसाल सरासरी ०.९७ लघुसिव्हर्ट मात्रादराचा सामना करावा लागतो.

पोटॅशियम

पोटॅशियम हे शरीराच्या धारणा आणि वाढीकरता आवश्यक असणारे मूलद्रव्य आहे. शरीरातील द्रव आणि पेशी यांच्यातील पाण्याचा विनिमय सर्वसामान्य राखण्याकरता त्याची आवश्यकता असते. उत्तेजनेस मज्जातंतू जे प्रतिसाद देतात त्याकरता आणि स्नायूंच्या आकुंचनाकरताही ह्याची गरज असते. ते आजवर निसर्गतः सर्वात विपुलतेने शरीरात आढळून येणारे किरणोत्सारी मूलद्रव्य आहे. सरासरी पुरूषात १४० ग्रॅम पोटॅशियम असते. शरीराचे वजन आणि स्नायूंच्या वजनाप्रमाणे हे प्रमाण बदलते असते. आपण रोज २.५ ग्रॅम पोटॅशियमचे सेवन करत असतो तर सुमारे तेवढेच बाहेर टाकून देत असतो. पोटॅशियमची तीन समस्थानिके आहेत. सर्वात विपूल म्हणजे ९३.२६% या प्रमाणात आढळून येणारे, के-३९ हे समस्थानिक स्थिर आहे. ६.७३% या प्रमाणात आढळून येणारे के-४१ समस्थानिकही स्थिर आहे. मात्र सर्वात कमी, ०.०११८% या प्रमाणात आढळून येणारे, के-४० हे समस्थानिक किरणोत्सारी आहे. त्याचे अर्धायू १.२६ अब्ज वर्षे इतके आहे. म्हणूनच ते अजूनही टिकून आहे. त्याचे विघटन होत असता ८९% वेळा, कमाल १३.३ लक्ष विजक-व्होल्ट ऊर्जेचे बीटा किरण उत्सर्जित करत असते. तर उर्वरित ११% वेळा, कमाल १४.६ लक्ष विजक-व्होल्ट ऊर्जेचे गॅमा किरण उत्सर्जित करत असते.

प्रारणांचा संसर्ग

जर उत्सर्जन मनुष्याच्या शरीरात गेले, तर त्यामुळे काही अणू क्षतिग्रस्त होतात परंतु जर उत्सर्जनाचा संसर्ग अधिक प्रमाणात नसेल व त्याचा कालावधी मोठा असेल तर क्षतिग्रस्त अणू स्वत:च आपली भरपाई करतात आणि पूर्व स्थितीमध्ये परत येतात. मनुष्याच्या शरीरामध्ये ही प्रक्रिया निसगर्त:च चालू असते. बर्‍याच वेळा असे देख़ील होते की ह्या भरपाई प्रक्रियेत हे क्षतिग्रस्त अणू चुकून एकमेकाला जोडले जातात. जर असे झाले तर दीर्घावधीत ह्याचा परिणाम पेशींच्या क्रियाशीलतेवर होतो. जर उत्सर्जन संसर्ग फार मोठया प्रमाणावर असेल आणि कमी वेळेत झाला असेल तर शरीराचे नैसर्गिक उपचार तंत्र बिघडून जाते व त्याचे काम बरोबर होत नाही. अशा स्थितीत उत्सर्जनाचा प्रभाव लगेच दिसून येतो. किरणोत्सारी पदार्थ आणि क्ष-किरण-जनित्रे निरनिराळ्या दराने आणि ऊर्जा-पातळ्यांवर प्रारणे निर्माण करत असतात. याकरता, प्रारणांची तीव्रता आणि ऊर्जा यांचे वर्णन करण्याकरता वापरले जाणारे पाच महत्त्वाचे पारिभाषिक शब्द आहेत ऊर्जा, सक्रियता, तीव्रता, संसर्ग आणि ताकद हे.

किरणोत्सार हाताळणार्‍यांना होणारा संसर्ग


एकोणीसाव्या शतकाअखेरीस, क्ष-किरणे आणि किरणोत्सार सक्रियता यांचे शोध लागल्यापासूनच, किरणोत्सार सजीवांसाठी हानीकारक ठरू शकत असल्याचे ज्ञान झालेले होते. त्या वेळी अनेक किरणोत्सारतज्ञ आणि किरणोत्सारी पदार्थ हाताळणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये त्वचारोग, अस्थींचा कर्करोग आणि रक्ताचा कर्करोग यांसारखे आजार अधिक प्रमाणात आढळून आले. ह्याचे कारण मुख्यत: काहीसा बेसावधपणा आणि काही परिस्थितींचे अज्ञान हे होते. अशीच स्थिती कित्येक दशकांपर्यंत चालत राहिली. शेवटी, १९२०च्या आरंभी किरणोत्सारी पदार्थ हाताळणार्‍या कर्मचार्‍यांकरता काही सुरक्षा व्यवस्था अंमलात आणणे सुरू झाले. यानंतर दहा वर्षांनी त्या कर्मचार्‍यांमध्ये उपर्युक्त रोगांचे अस्तित्व खूपच कमी झालेले होते.

१ स्त्रोतः “नाभिकीय ऊर्जा से विद्युत उत्पादन”, श्री.गोरा चक्रवर्ती आणि डॉ.तेजेनकुमार बसू.
२ परमाणु ऊर्जा और विकिरण के संबंध में जनधारणाएं: भ्रांतियाँ बनाम वास्तविकता, परमाणु ऊर्जा विभाग, पृष्ठ-६.
३ परमाणु ऊर्जा और विकिरण के संबंध में जनधारणाएं: भ्रांतियाँ बनाम वास्तविकता, परमाणु ऊर्जा विभाग, पृष्ठ-६.
४ स्त्रोत: http://www.rerowland.com/K40.html

नरेंद्र गोळे, narendra.v.gole@gmail.com, http://urjasval.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: